पुणे जिल्हा | गस्तीसाठी बॅटरींचे वाटप

भिगवण, (वार्ताहर)- भिगवण ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबवत चोरांपासून संरक्षण करण्यासाठी गस्त घालणार्या लोकांकरिता बॅटरींचे वाटप केले. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी भिगवण आणि परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भीतीमुळे ग्रामस्थ रात्र रात्र जागरण करून काढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भिगवण स्टेशन येथील युवकांनी नागरिकांच्या संरक्षणार्थ रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली असून, त्याकरिता युवकांना बॅटरीची गरज भासत असल्याने ग्रामपंचायतीने या युवकांना प्रतिसाद देत मदत म्हणून बॅटरींचे वाटप केले.
भिगवण ग्रामपंचायत कडून पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेकरिता ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगामध्ये खर्च करण्याची तरतूद असून त्यानुसार ग्रामपंचायतीने गावातील लोकांच्या सुरक्षेकरिता या बॅटरींचे वाटप केले असल्याचे सरपंच दीपिका क्षीरसागर व उपसरपंच मुमताज शेख यांनी सांगितले.
श्रेयवादाच्या राजकारणाला ग्रामस्थांची चपराक
बॅटरी वाटपाचे श्रेय स्वतःला घेण्यासाठी भिगवण स्टेशन येथील एका ग्रामपंचायत सदस्याने नामी शक्कल लढवत या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा सल्ला गस्त घालणार्या कार्यकर्त्यांना दिला;
मात्र याला फाटा देत उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांनी कार्यक्रमात या सदस्याची लुडबूड बघता वेळीच शाब्दिक चपराक दिल्याने उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या.

