वंशभेदाच्या आरोपांमुळे सर्व कुटुंबाला दुःख झाले; महाराणी एलिझाबेथ यांनी मौन सोडले

लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांनी केलेल्या आरोपांबाबत महाराणी एलिझाबेथ – द्वितीय यांनी प्रथमच मौन सोडले आहे. राजघराण्यातून वंशभेदाची वागणूक मिळत असल्याचा आरोप हॅरी आणि मेघन या राजदाम्पत्याने केल्यानंतर संपूर्ण कुटुंबच दुःखी झाले, अशा शब्दात त्यांनी राजघराण्याबाबतची चिंता आणि वेदनाही बोलून दाखवली आहे. गेली काही वर्षे हॅरी आणि मेघन मर्केल या दोघांसाठी किती यातनादायक होती, याचा सविस्तर वृत्तांत ऐकल्यानंतर पूर्ण कुटुंबच दुःखी झाले, असे त्यांच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
हॅरी आणि मेघन यांनी उपस्थित केलेले सर्वच मुद्दे, विशेषतः त्यातील वंशभेदाचा मुद्दा अतिशय चिंता वाटावी, असा आहे. त्यातील काही तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. पण त्याची दखल अत्यंत गांभीर्याने घेण्यात आली आहे. या सर्व मुद्दयांबाबत राजघराण्याकडून खासगीत योग्य ती काळजी घेतली जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
महाराणी एलिझाबेथ यांचे नातू हॅरी आणि नात सून मेघन मर्केल यांनी मुलाखतीदरम्यान केलेल्या विविध दाव्यांमुळे ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या दाव्यांना फेटाळणे अथवा त्यावर उपाय योजना करण्यासंदर्भात राजघराण्यावर मोठा दबाव यायला लागला होता. ऑपरा विनफ्रे यांच्या मुलाखतीदरम्यान राजघराण्यातील 1990 पासूनच्या अंतर्गत कलहाला चव्हाट्यावर आणले गेले. अजून जन्मही न झालेल्या बालकाच्या त्वचेच्या वर्णाविषयी राजघराण्यातून शंका उपस्थित व्हायला लागली. या मेघन यांच्या वक्तव्यामुळे राजघराण्यातील वंशभेदाच्या संकुचित मनोवृत्तीला उघड केले गेले.
मेघन यांची आई कृष्णवर्णीय आणि वडील श्वेतवर्णीय असल्याने त्यांना अश्वेत असल्याप्रमाणे सावत्रपणाची वागणूक मिळाली. त्यातूनच त्यांच्या मनात आत्महत्येचे टोकाचे विचार यायला लागल्याचे स्वतः मेघन यांनी या मुलाखतीत सांगितले होते.
राजघराण्यातील संकुचित वर्तनामुळेच हॅरी आणि मर्केल यांनी राजघराण्याचा निरोप घेऊन आपले राजशिष्टाचाराचे अधिकारही सोडून दिले आहेत.





