Sunetra Pawar : राष्ट्रवादीचे अर्थखाते भाजपने चोरल्याचा आरोप; सुनेत्रा पवार म्हणाल्या..
Sunetra Pawar : राष्ट्रवादीचे अर्थखाते भाजपने चोरल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. या आरोपानंतर महायुतीतील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Sunetra Pawar : राज्याचे अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे खाते असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेले अर्थखाते आता भाजपकडे गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे यावे, यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता खोचक प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे अर्थखाते भाजपने चोरल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. या आरोपानंतर महायुतीतील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. ‘काही जण चुकीच्या गोष्टी पसरवण्यात माहीर असतात,’ असा खोचक टोला त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी महायुती म्हणून सर्वजण एकत्र आहेत. मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नांदेडसह मराठवाड्यातील राजकीय प्रचारादरम्यान त्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या सभेत बोलत होत्या. सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी महायुतीची ताकद एकत्र आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
गिरीश महाजन यांनी साधला निशाणा
दरम्यान, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. इतरत्र लक्ष घालण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले, तर आगामी काळात दोन-चार जागा अधिक निवडून येतील, असा टोला महाजन यांनी लगावला. त्यामुळे अर्थखात्यावरून सुरू झालेला हा राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघासाठी आज मतदान; 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात






