Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दुहेरी नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने मोठा कायदेशीर दिलासा दिला आहे. न्यायालयाने शनिवारी स्वतःच्याच एक दिवस जुन्या निर्णयाला स्थगिती दिली असून, राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश तूर्तास थांबवले आहेत. शुक्रवारी (१७ एप्रिल) न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शनिवारी यावर फेरविचार करताना न्यायालयाने स्पष्ट केले की, राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या याचिकेवर कोणताही अंतिम निर्णय घेता येणार नाही. जोपर्यंत ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत एफआयआर नोंदवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे आरोप काय आहेत? कर्नाटकचे भाजप कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असून त्यांनी भारतीय कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांनी शत्रू देशांना माहिती पुरवली आणि बनावट पासपोर्ट मिळवला, असा खळबळजनक आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. विदेशी नागरिक असतानाही त्यांनी रायबरेली, वायनाड आणि अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवून ‘भारतीय नागरिकत्व कायद्या’चा भंग केला आहे. न्यायालयाची भूमिका – यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये लखनौमधील विशेष एमपी-आमदार (MP-MLA) न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर शिशिर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा घडल्याचे निरीक्षण नोंदवले होते, मात्र शनिवारी अंतिम स्वाक्षरी केलेला आदेश राखून ठेवला आणि गांधींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्याचे निश्चित केले. याचिकाकर्ते विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयाच्या सुरुवातीच्या निर्णयाचे स्वागत करताना याला ‘ऐतिहासिक निकाल’ म्हटले होते. भारतीय राज्यघटना आणि नागरिकत्व कायद्यानुसार कोणत्याही विदेशी नागरिकाला भारतीय नागरिकत्व राखता येत नाही किंवा निवडणूक लढवता येत नाही, असे त्यांनी एएनआय (ANI) शी बोलताना सांगितले. तथापि, हायकोर्टाने आता या आदेशाला स्थगिती दिल्याने राहुल गांधींवरील अटकेची किंवा तात्काळ कायदेशीर कारवाईची टांगती तलवार तूर्तास टळली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर पार पडणार आहे.