देशातील सर्व टोलनाके होणार हद्दपार – नितीन गडकरी

नवी दिल्ली- देशभरात सर्वत्र महामार्गांचे जाळे उभारण्यात आले आहे आणि या महामार्गावर अनेक टोलनाके सुद्धा कार्यरत आहेत. फास्टटॅगसारख्या यंत्रणेच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असली तरी भविष्यात सर्व टोलनाके हद्दपार होणार असून फक्त गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारेच परस्पर टोलची रक्कम कपात होणार आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतेच अशा प्रकारचे संकेत दिले असून नजीकच्या कालावधीमध्ये ही यंत्रणा देशभरात सर्वत्र राबवण्यात येणार आहे. सध्या देशभरातील टोलनाक्यावर जी टोलवसुली केली जाते त्यासाठी 97% फास्टटॅग यंत्रणा वापरली जाते. तरीही वाहतूक शंभर टक्के सुरळीत झालेली नाही म्हणूनच आता या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी वाहनांवर अत्याधुनिक पद्धतीच्या नंबर प्लेट्स बसवाव्या लागणार आहेत.
दोन हजार एकोणीस नंतर जी वाहने बाजारात आली आहेत त्या वाहनांवर या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या आहेत महामार्गावर असलेल्या अतिशय उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या नंबरप्लेटवर नजर ठेवून नंबरशी संबंधित असलेल्या बॅंक खात्यातून आपोआप टोलची रक्कम आता कपात होणार आहे. या कॅमेऱ्यांना ऍटोमॅटीक नंबर प्लेट रीडर कॅमेरे असे म्हणण्यात येत आहे. वाहनावर ज्या नंबर प्लेट लावण्यात येणार आहे त्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणण्यात येते.
देशातील सर्व वाहन कंपन्यांना गाड्या तयार करतानाच या अत्याधुनिक नंबर प्लेट गाड्यांवर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच 2019 पूर्वीची वाहने आहेत त्यांचा नंबर प्लेटसही टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत भारतातील सध्याच्या टोल धोरणाप्रमाणे साठ किलोमीटर अंतरावर दोन टोल नाके असतात.
आता नवीन योजनेप्रमाणे तुम्ही जेवढा रस्ता वापरणार आहात तेवढेच तुमचे टोलचे पैसे कट होणार आहेत. म्हणजे समजा एखाद्या वाहनचालकाने साठ किलोमीटरऐवजी तीस किलोमिटरचा प्रवास केला तर त्याला अर्धा टोल द्यावा लागणार आहे. ही यंत्रणा कार्यरत झाल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून प्रदूषणावर नियंत्रण बसणार आहे. टोलनाक्यावरील गर्दी कमी होणार आहे. देशात सध्या सुमारे आठशे टोल नाके कार्यरत असून त्यावर आत्तापर्यंत पाच कोटीपेक्षा जास्त फास्ट टॅग यंत्रणा कार्यरत आहेत.





