पुणे | खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे काठोकाठ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे काठोकाठ भरली आहेत. प्रकल्पात एकूण पाणीसाठा 29.02 टीएमसी म्हणजे 99.55 टक्के इतका जमा झाला आहे. यंदा खडकवासला प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाल्याने वर्षभरासाठी शहरातील पाण्याची व शेतीच्या पाण्याची चिंता मिटली.
मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही चार धरणे जेमतेम भरली होती. यंदा मात्र दमदार पावसामुळे धरणात चांगला पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. वर्षभरात तीन ते चार आर्वतने सोडण्यात येतात. त्यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील शेतीला याचा फायदा होतो. यंदा धरणे भरल्याने शेती आणि शहराची पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
खडकवासला धरणात 1.86 टीएमसी, पानशेत 10.63 टीएमसी, वरसगाव 12.82 टीएमसी, तर टेमघर धरणात 3.71 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1005 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.





