“मागील साडेसात वर्षांत देशात जो बदल घडला, त्याचं सगळं श्रेय उत्तर प्रदेशातल्या जनतेला जातं”– अमित शाह

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसून येत आहेत. भाजपाने सुद्धा आपली सत्ता टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बांके बिहारी मंदिराला भेट दिली. तसेच देशातल्या आणि उत्तर प्रदेशातल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातल्या जनत्याचे असल्याचे मत यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केले.
बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी इथल्या लोकांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केले. एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, मथुरेत अमित शाह यांनी घरोघरी जाऊन मते मागण्याच्या Door to Door Campaign ला सुरूवात केली. त्यानंतर अमित शाह यांनी प्रभावी मतदाता संवाद या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “मी २०२२ च्या निवडणुकांमध्ये मथुरेतल्या सगळ्या भाजपा उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी मतं मागण्यासाठी आलो आहे. मथुरेचं भव्य दिव्य रुप तिला पुन्हा मिळवून देणं हाच आमचा संकल्प आहे”.
उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारच्या कामगिरीबद्दल बोलताना अमित शाह म्हणाले, “अखिलेश सरकारच्या तुलनेत योगी सरकारमध्ये दरोडे ७० टक्क्यांनी आणि चोऱ्या ७२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. खूनाच्या प्रकरणांमध्ये २९ टक्क्यांनी तर अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ३५ टक्क्यांची घट झाली आहे”.
अमित शाह म्हणाले, “मी या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे हात जोडून आभार मानतो. निवडणुका २०१४ च्या असो, २०१७ त्या असो किंवा २०२२ च्या, इथले नागरिक कायमच भाजपाला भरघोस मतं देतात. मी या जनतेला सांगू इच्छितो की गेल्या साडेसात वर्षांत देशात आणि उत्तर प्रदेशात जो बदल घडला आहे त्याचं सगळं श्रेय उत्तर प्रदेशातल्या महान जनतेला जातं. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सरकारांनी केवळ जातिवाद आणि परिवारवादाला प्राधान्य दिलं. भ्रष्टाचार त्यांच्या काळात बोकाळला”.




