Rajendra Pawar Post : ‘प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले’; राजेंद्र पवारांनी अजित पवारांसोबतच्या बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा
Rajendra Pawar Post : या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या लहानपणीच्या दिवाळीतील आठवणींना उजाळा दिला आहे.

Rajendra Pawar Post : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून, यंदाचा दिवाळी हा सण अजित पवार यांच्याविना असल्याने पवार कुटुंबासाठी मोठी दु:ख बाब आहे. दरवर्षी पवार कुटुंबाच्या वतीने बारामती येथील गोविंदबागेत दिवाळी पाडवा साजरा करतो. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी गोविंदबागेत दाखल होतात. यंदा या परंपरेला खंड पडला आहे.
दिवाळीनिमित्ताने राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या लहानपणीच्या दिवाळीतील आठवणींना उजाळा दिला आहे. फेसबुक पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
नवीन असलेले पॅराशूट उडाले की ते पकडायला काट्या-कुट्यातून धावत होतो
राजेंद्र पवार पोस्टमध्ये म्हणतात, “अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय. लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या. तासेब(अनंतराव) फटाके आणत,सर्वांना समान वाटून देत. फटाके दिवसभर पुरवून वापरण्यासाठी अंधाऱ्या कोठडीतील घडवंचीवरील पोत्याच्या भकश्यात कोणाला सापडू नये म्हणून आपण लपवून ठेवत होतो. त्यावेळी नवीन असलेले पॅराशूट उडाले की ते पकडायला काट्या-कुट्यातून धावत होतो, अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू एकत्र करून दुसर्या दिवशी पेटवत होतो. आजीच्या धाकाने आपले घरदार सुतासारखे सरळ चालत होते, आता तू असतास तर वेगळा धाक व प्रेम राहिले असते. दिवाळीला ND पाटील(आत्यामुळे मामा) आले की घर गप्पांनी भरून जाई. ते वेगळ्या पक्षाचे, स्वतःच्या वैयक्तिक तत्त्वांचे पण त्यांचे प्रत्येक वयातील व्यक्तीशी जमायचे. पक्ष व आपले तत्व हे वेगळे ठेवून नाती जपायची असतात हे शिकलो.” अशी आठवण त्यांनी सांगितली.
…ही शिकवण मागच्या पिढीने आपल्याला दिली
पोस्टमध्ये राजेंद्र पवार पुढे म्हणतात “त्याकाळी एवढ्या पाहुण्यांना टोपलीचा एकच संडास; मग चिल्या-पिल्यांना पत्र्यामागे ओळीने बसावे लागे, अशावेळी पुढे मागे सरकावे लागे या अनुभवामुळे भविष्यात कोणाशीही जमवून घेणे आपल्याला सोपे गेले. घरामागच्या आडावर अर्धी आमराई पाणी भरायची, पहाटेपासून कावडीचे कुई-कुई आवाज चालायचे. यावेळी पायरीवर बसून विटकर घासून किंवा राखेची राखुंडी दाताला लावत असताना आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाजाचाही वाटा असतो ही शिकवण मागच्या पिढीने आपल्याला दिली. घरट्यातून पडलेली पक्ष्यांची पिलं सापडली की आपण फिरस्त्या शेळीचे दूध काढून त्यांना पाजत होतो. “
अजित पवार यांना आवडणाऱ्या गोष्टीचा उल्लेख पोस्टमध्ये राजेंद्र पवार यांनी केला आहे. “तुझ्या कपड्याच्या वेगळ्या आवडी-निवडीमुळे राजेश खन्ना स्टाइलचे कपडे फक्त तुलाच होते. दिवाळ्या येत-जात राहणार पण लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींची कुरूपं मात्र आता बोचून एकटेपणा देत राहणार.”
प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले
“मी शेती करत बारामतीत राहिलो तशीच माझी मुलं पण इथंच राहिली. तुम्ही भावंडं मुंबईला गेलात, तुमची मुलं तिथंच जन्मली,वाढली,परदेशी शिकली.या साऱ्या पुढील पिढ्यांना आपली लहानपणाची आपुलकीची दिवाळी कशी समजणार? आपल्या नात्यातील घट्ट विण व आपले ऋणांनुबंधाचे हळवे धागे कसे समजणार? प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे…राजुदादा” असा पोस्टचा शेवट राजेंद्र पवार यांनी केला आहे.





