Mukesh Ambani : सर्व विक्रम मोडीत काढले.! मुकेश अंबानी यांनाही ‘धुरंधर’ची भुरळ; रणवीर सिंग बद्दल म्हणाले….
या चित्रपटांमध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली असून, ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या आणि यशस्वी भूमिकांपैकी एक ठरत आहे.

Mukesh Ambani । Dhurandhar : दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेल्या या फ्रँचायजीने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकांचे मोठे आकर्षण मिळवले आहे.
या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, समीक्षकांनीही त्याच्या कथा, दिग्दर्शन, अॅक्शन सीक्वेन्स आणि सादरीकरणाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, या यशाच्या पार्श्वभूमीवर उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रातूनही ‘धुरंधर’ फ्रँचायजीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ स्टुडिओजच्या यशाचा उल्लेख करताना या फ्रँचायजीचे विशेष कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिओ स्टुडिओजने मागील काही वर्षांत सातत्याने मोठ्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली असून ‘धुरंधर’ मालिकेने या यशाला नवी दिशा दिली आहे.
ते म्हणाले, जियो स्टुडिओजने सलग तीन वर्षांपर्यंत सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट देऊन अनोखा विक्रम रचला आहे. 2024 मध्ये स्त्री 2, 2025 मध्ये धुरंधर आणि 2026 मध्ये धुरंधर : रिव्हेंज. यावरून आमचं सातत्य आणि नेतृत्त्व सिद्ध होतं. भारतात तर सोडाच पण जगभरात यापूर्वी कधीही धुरंधरसारख्या फ्रँचाइजीची संकल्पना, त्यासाठीचा निधी आणि इतक्या कमी कालावधीत दोन भागांचं शूटिंग केलं गेलं नाही.
धुरंधरच्या पहिल्या भागाने आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा विक्रम प्रस्थापिक केला. या चित्रपटाने थिएटर्समध्ये सलग 15 आठवडे चालून एक अभूतपूर्व विक्रम रचला. त्यानंतर प्रचंड अपेक्षेनं दुसरा भाग दाखल झाला आणि त्याने पहिल्या भागाचेही सर्व विक्रम मोडीत काढले”, अशा शब्दांत अंबानी यांनी कौतुक केलं.
पहिल्या भागाने प्रदर्शित झाल्यानंतर दीर्घ काळ थिएटरमध्ये टिकून राहण्याचा विक्रम केला, तर दुसऱ्या भागाने पहिल्या भागाच्या तुलनेत अधिक कमाई करत फ्रँचायजीला पुढील स्तरावर नेले. या यशामुळे निर्मात्यांनी घेतलेला मोठा आर्थिक आणि सर्जनशील धोका यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
या चित्रपटांमध्ये रणवीर सिंहने हमजा अली मजारी या गुप्तहेराची भूमिका साकारली असून, ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या आणि यशस्वी भूमिकांपैकी एक ठरत आहे. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळत असून, त्याची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
रणवीर सिंहसोबत या चित्रपटांमध्ये आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक प्रभावी झाली आहे.






