अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धा : एकेरीत नमिश, प्रार्थनाला विजेतेपद…

All India Ranking Tennis Tournament : शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या तर्फे आयोजित शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात प्रार्थना खेडकर हिने, तर मुलांच्या गटात नमिश हुड याने विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत प्रजीतरेड्डी मदिरेड्डी व अंशुल पुजारी यांनी तर, सारा फेंगसे व जान्हवी चौगुले यांनी विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या मुलांच्या गटात अंतिम फेरीत नमिश हुड याने तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 1तास 20मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये नमिशने सर्वज्ञची पहिल्या, तिसऱ्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये नमिशने सर्वज्ञला फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये पहिल्या व सातव्या गेममध्ये सर्वज्ञची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत पाचव्या मानांकित प्रार्थना खेडकर हिने तिसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेचा 6-2, 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रार्थना हि द गुडस सॅमेरीटन शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून मनोज कुसाळकर टेनिस अकदामीत प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/swiss-open-badminton-2024-pv-sindhu-lakshya-sen-out-kidambi-srikanth-makes-it-to-quarterfinals/
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डी व अंशुल पुजारी यांनी दुसऱ्या मानांकित आरुष पोतदार व आरव पटेल यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित जान्हवी चौगुले हिने सारा फेंगसेच्या साथीत दुसऱ्या मानांकित रित्सा कोंडकर व मायरा टोपनो यांचा 6-1,6-3 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.





