मध्यप्रदेशातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार

भोपाळ, – मध्यप्रदेशात भोपाळच्या सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत चार बालकांचा होरपळून मृत्त्यू झाल्याच्या घटनेनंतर जागे झालेल्या राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांच्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे.
मुख्यमंत्री चौहान यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले की, भोपाळच्या रूग्णालयात लागलेली आग हा निष्काळजीपणाचा प्रकार होता. यातील दोषींना आम्ही सोडणार नाही. ते म्हणाले की आता बहुतेक रुग्णालयांना ऑक्सिजन साठा पुरवण्यात आला आहे.
त्यांच्या पाईपलाईनमुळे आगीचा धोकाही मोठ्या प्रमाणात संभवत असल्याने प्रत्येक रूग्णालयाच्या बाबतीत यापुढे नीट काळजी घेतली जाणार आहे.
भोपाळच्या कमलानेहरू बालकांच्या रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या विशेष काळजी कक्षातच काल ही आग लागली. त्यात चार नवजात अर्भके जळून गतप्राण झाली. तेथील 36 अर्भके कर्मचाऱ्यांनी वाचवली.




