“सगळा कमिशनचा व्यवहार चालू”; आनंदाचा शिधावरून नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

मुंबई – राज्य सरकारकडून नागरिकांना दिवाळी साजरी करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. 100 रुपयांमध्ये हा शिधा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या वर्षीही राज्य सरकारडून आनंदाचा शिधा देण्यात आला होता. त्यानंतर याहीवर्षी देण्यात येणार आहे.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अनेक महत्वाच्या निर्णयासह दिवाळीला दिला जाणाऱ्या आनंदाच्या शिधाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यंदा या शिधामध्ये अधिकच्या दोन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘आनंदाच्या शिधा देण्याच्या नावावरून सगळा कमिशनचा व्यवहार चाललेला आहे. या शिंदे सरकारमध्ये आनंदाच्या शिधाच्या नावाने लोकांना लालच देण्याचं काम सुरू आहे. यांचही टेंडर निर्मल भवनमध्येच होणार आहे. याद्वारे राज्यात फक्त लूट सुरू आहे,’ असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
530 कोटी 19 लाख खर्च
आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील आजच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आनंदाचा शिधा या संचात 1 किलो साखर, 1 लीटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा असणार आहे.





