पिंपरी | सर्वच उमेदवार होणार ‘खासदार’!

वडगाव मावळ, {किशोर ढोरे} – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघा पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. परंतु, उत्साही पदाधिकारी, कार्यकर्ते मतदानाची आकडेमोड करून आपल्याच नेत्याला सोशल मीडियावर विजयी घोषित करून मोकळे होत आहेत. त्यामुळे लोकसभा लढविलेले सर्वच पक्षांचे उमेदवार ‘खासदार’ बनल्याची खुमासदार चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघात घाटाखालील पनवेल, कर्जत, उरण हे विधानसभा मतदार संघ येतात. तर घाटावरील मावळ, चिंचवड, पिंपरी हे मतदार संघ येतात. या मतदार संघात एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार आहेत. यापैकी १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी मतदान केल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे. यंदा ३३ उमेदवार मैदानात होते. त्यापैकी खरी लढत ही महायुती, महाविकास आघाडी यांच्यात झाली.
कोणत्या उमेदवाराने कुणाची मते खाल्ली, कोण जिंकणार, कुणाचा पराभव होणार, हे येत्या ४ जून रोजी निकालातून स्पष्ट होईल. परंतु, त्याआधीच अनेक अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गोळाबेरीज करून आपल्या नेत्यांना विजयी घोषित करून ‘खासदार’ ही बनवून टाकलेय ! यंदाच्या निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तो जोश नव्हता.
मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले. आधी मतदारांना घराबाहेर काढणे, मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे, पुन्हा घरापर्यंत सोडणे अशा प्रकारे मतदान करून घेतले जात होते. परंतु, यंदा पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येच निरुत्साह दिसून आला. बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत होते. अनेक नेते, पदाधिकारी हे निवडणूक प्रक्रियेत कुठेच दिसून आले नाहीत.
त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे राजकीय विश्लेषकांनाही अवघड झालेले आहे. अशात उमेदवारांच्या ‘जवळचे’ पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र हार मानायला तयार नाहीत. कोणत्या भागात किती मतदान कुणाला मिळाले, याची टोटल मारून आमच्याच नेत्याचा विजय होणार, असे दावे ते करू लागले आहेत. मतमोजणीपूर्वीच कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘निकाल’ जाहीर करून टाकला. सध्या मावळ तालुक्यात त्याचीच चर्चा सुरू आहे.
राजकीय तज्ज्ञांना बांधता येईना अंदाज
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या जरी जास्त असली तर अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. त्यामुळे कोणता उमेदवार निवडून येईल, याचा राजकीय जाणकारही अंदाज बांधू शकत नाहीत.
मतदारांच्या मनात काय होते, कोणाची लाट होती, कोणत्या पक्षाबाबत सहानुभूती होती, मतदारांच्या मनात नेमके काय होते, त्याबाबत नक्की कुणालाच सांगता येत नाही. तथापि, जो निवडून येईल तो कमी मताधिक्याने विजयी होईल, अशी शक्यता मात्र सारेच व्यक्त करीत आहेत.





