रविकांत तुपकर यांच्यसह सर्व सहकाऱ्यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयाने दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत असून आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन 11 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर तुपकरांसह 25 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्याने 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आले आहे. रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्ते यांच्या संघर्ष झाला होता. त्यांनतर रविकांत तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलवण्यात आले होते.
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली होती. त्यांनी कोर्टातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलं होतं. त्यांच्या आंदोलनानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती.





