#video : “राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा…”; सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचे प्रत्युत्तर

मुंबई : उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे या सध्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्या भाजपा, शिंदे गट आणि मनसेवरदेखील कठोर शब्दांत टीका करत आहेत. सध्या त्यांची प्रबोधनयात्रा सुरू असून कोल्हापुरातील यात्रेत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणे उर्मटपणा असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अंधारे यांच्या याच टीकेला मनसेकडून सडकून उत्तर देण्यात आले आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
गजानन काळे यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत गजानन काळे यांनी अंधारेंना लक्ष्य केले आहे.
८०-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग आहे,हात थरथर करायला लागले आहेत,असं बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल विधान करणं याला उर्मटपणा म्हणतात..
महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या लावरे तो व्हिडिओला उर्मटपणा म्हणण्या अगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा.. pic.twitter.com/hNbDLmTXlz
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) November 16, 2022
‘८०-८५ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे. हात थरथर करायला लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असे विधान करणे याला उर्मटपणा म्हणतात. महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या ‘लावरे तो व्हिडिओ’ला उर्मटपणा म्हणण्याअगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा,’ अशी खोचक टीका गजानन काळे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या धडाकेबाज भाषणांच्या माध्यमातून त्या सभा जिंकत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात बोलताना त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा त्यांचा उर्मटपणा आहे. आपण ‘दादा व्हिडीओ लाव म्हणू’ असे खोचक विधान सुषमा अंधारे यांनी केले होते.





