Alia Bhatt On Assam Floods: “हे दरवर्षी घडतं, तरीही…”; आसाममधील पूरपरिस्थितीवर आलिया भट्टची पोस्ट; मदतीचे आवाहन
Alia Bhatt On Assam Floods: सलमान खान, भूमी पेडणेकर, अदा शर्मा, राशी खन्ना, गायक गुरू रंधावा आणि गायक पापोन यांचेही आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

Alia Bhatt On Assam Floods : आसाममध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पूरपरिस्थितीमुळे लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. हजारो कुटुंबं उघड्यावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान आणि भूमी पेडणेकर यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने पूरग्रस्त आसामसाठी मदतचे आवाहन केले आहे.
इंस्टाग्राम स्टोरीजवर एक भावनिक संदेश शेअर करत आलिया भट्टने या संकटाचे गांभीर्य मांडले आणि आपले चाहते व देशवासियांना मदतकार्यात योगदान देण्याची विनंती केली. इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत आलियाने लिहिलं, “सध्या आपल्या देशाच्या अनेक भागांत पूर आला आहे, ज्यामध्ये आसाम सर्वात जास्त प्रभावित झाला असून अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेक कुटुंबांनी आपली घरं, शेती, जनावरे आणि काहींनी आपल्या प्रियजनांनाही गमावलं आहे.”
तिने पुढे लिहिलं, “हे दरवर्षी घडतं, तरीही आपण त्यासाठी तयार नसतो. आसामला तातडीच्या मदतीची गरज आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत सातत्याने मदत पोहोचणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक संस्थांमार्फत मदत कशी करता येईल, याची माहिती मी शेअर करणार आहे”.
तिचे हे आवाहन अशा वेळी आले आहे, जेव्हा आसाममधील पुराची परिस्थिती राज्यभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. बॉलिवूडचा आणखी एक स्टार सलमान खाननेही आपल्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशनच्या (संस्थेच्या) माध्यमातून आसाममधील एका फॅन क्लबसोबत (SKFC) मिळून मदत मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी सलमान खान, अभिनेत्री भूमी पेडणेकर, अदा शर्मा, राशी खन्ना, गायक गुरू रंधावा आणि गायक पापोन यांनीही आपल्या फॉलोअर्सना आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे.
हेही वाचा:






