विदेशी मद्याबरोबर देशी दारूचीही चढ्या दराने विक्री
पिंपरी – लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता बाकीचे सर्व नागरिक गेल्या सव्वा महिन्यापासून घरीच बसून आहेत. त्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने विशेष करून तळीरामांची मोठी घालमेल होत असतानाच सोमवारनंतर मद्यविक्रीची दुकाने उघडली आहेत. मद्यविक्रीच्या दुकानांसमोर तळीरामांची होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारी ठरू लागली आहे. चढ्या दराने विक्री होत असतानाही तळीरामांची होणारी गर्दी “करोना’चा धोका वाढविणारी ठरू लागली आहे.
टाळेबंदीमुळे गेल्या सव्वा महिन्यांपासून मद्य विक्रीची दुकाने (वाईन शॉप) आणि बियर बार बंद होते. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच पंचाईत झाली होती. मात्र सोमवारनंतर मद्यविक्रीची दुकाने उघडली आहेत. दुकाने उघडताच सोमवारी सकाळपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेनमेंट झोन वगळता विविध मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर मद्य विकत घेण्यासाठी तळीरामांच्या रांगा लागल्या होत्या. करोनाचा रेड झोन असलेल्या भोसरी लगतच्या चऱ्होली भागात तर दारू खरेदीसाठी गेल्या चार दिवसांपासून झुंबड उडाली आहे. चऱ्होली फाट्यावरील वाइन शॉपमुळे सोसायट्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार शहरातील इतरही भागात गेल्या सहा दिवसांपासून पहावयास मिळत आहे.
दुकानांपुढील गर्दी फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाइन शॉपच्या समोरील गर्दीमुळे सामुदायिक संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. असे येथील नागिरकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने उघडल्यामुळे दारूची विक्री चढ्या दराने होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच मद्याचा पुरेसा साठा करून ठेवला. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे किंवा अर्थप्राप्ती बेताची आहे, अशा तळीरामांची घालमेल वाढली होती. आता दुकाने सुरू झाल्यामुळे ही घालमेल संपली असली तरी सर्वसामान्यांची मात्र करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे घालमेल वाढली आहे.
तक्रार नसल्याने कारवाई नाही
राज्य उत्पादन शुल्क विभागच्या पिंपरी कार्यालयातंर्गत नोंदणीकृत 125 हॉटेल, 30 वाईन शॉप, 30 देशी दारूची दुकाने, 70 बिअर शॉप येतात. दारू खरेदीसाठी बाहेर पडलेल्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दारूची चढ्या दराने विक्री आहे. मात्र याबाबत एकही खरेदीदार तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. लेखी तक्रार आल्यास तातडीने कारवाई केली जाते, दारू विकेत्याचे लायसन्स रद्द होऊ शकते. मात्र तक्रार नसल्याने कारवाई करण्यात अडथळा येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.