Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे वाईन बार चालकांनी शासनाच्या नियमांची उघडपणे थट्टा मांडली आहे. बारच्या चार भिंतींच्या आत होणारी विक्री आता थेट रस्त्यावर आली असून, फोन केला की बाईकवरून दारू घरपोच देण्याचा ‘मोबाईल बार’ फंडा सध्या गावात जोरात सुरू आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये, विशेषतः महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांचा वचक, पण उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष? काही काळापूर्वी पानकनेरगावात अवैध दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी एकवटून आवाज उठवल्यानंतर, सेनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे गावात समाधान होते. मात्र, आता हे समाधान अल्पजीवी ठरताना दिसत आहे. अधिकृत परवानाधारक वाईन बार चालकांनीच आता बेकायदेशीर मार्ग अवलंबल्याने पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. “सेनगाव पोलीस अवैध दारू बंद करू शकतात, तर मग राज्य उत्पादन शुल्क विभाग या मुजोर बार चालकांवर कारवाई का करत नाही?” असा सवाल आता गावकरी विचारत आहेत. बार चालकांचा नवा ‘फंडा’: फोन करा, दारू मिळवा! गावात ३ ते ४ शासनमान्य वाईन बार आहेत. नियमानुसार दारूची विक्री ठराविक वेळेत आणि बारच्या जागेतच होणे बंधनकारक आहे. मात्र, येथील काही बार चालक सर्व नियम धाब्यावर बसवून काम करत आहेत. दुकाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा आधीच उघडली जातात. ग्राहकाचे वय न तपासता अल्पवयीन मुलांनाही दारू दिली जात आहे. फोनवर ऑर्डर मिळताच बाईकवरून दारू थेट दारात पोहोचवली जात आहे. तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत – दारू सहज आणि घरपोच उपलब्ध होत असल्यामुळे १८ ते १९ वयोगटातील तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गावात घरगुती भांडणे, अपघात आणि गुन्हेगारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यंतरी काही दिवस चौकशी केली होती, मात्र कारवाईचा धाक ओसरताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांचा आंदोलनाचा इशारा – प्रशासनाने केवळ दोन दिवसांची दिखाऊ कारवाई न करता, या प्रकाराला कायमचा लगाम घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. दोषी बार चालकांचे परवाने रद्द करून ही ‘मोबाईल डिलिव्हरी’ तत्काळ थांबवावी. जर उत्पादन शुल्क विभागाने याकडे दुर्लक्ष केले, तर लवकरच सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील, असा इशाराही पानकनेरगावातील महिलांनी दिला आहे.