आळंदीकरांचा पाण्यासाठी एल्गार; नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन

आळंदी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी शहरात पाणीटंचाईने नागरिकांचे हाल बेहाल झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चार ते पाच दिवसांआड केवळ एक ते दीड तासच पाणीपुरवठा होत असल्याने पिण्यासह दैनंदिन गरजांसाठीही पाण्याची वानवण नागरिकांना भेडसावत आहे. या अनियमित आणि अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आळंदीकरांनी आज, ७ एप्रिल रोजी नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. नवीन गृहप्रकल्प, हॉटेल्स आणि धर्मशाळांना दहा ते वीस अनधिकृत नळजोडण्या देऊनही केवळ एकाच कनेक्शनची पाणीपट्टी आकारली जाते. शिवाय, पालिका हद्दीबाहेरील अनधिकृत नळजोडण्यांकडून कोणतीही पाणीपट्टी वसूल केली जात नाही. पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीदरम्यान नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यानेही संताप वाढला आहे. ग्रामस्थांनी मागणी केली की, अनधिकृत कनेक्शन्स अधिकृत करून पाणीपट्टी वसूल करावी आणि पालिका कर्मचार्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी मागील मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि आमदार बाबाजी काळे यांच्या बैठकीचा आढावा घेत लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी त्यांना निवेदन सादर करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
कायमस्वरूपी अधिकारी नियुक्ती: पाणीपुरवठा विभागप्रमुख म्हणून आळंदीची पूर्ण माहिती असलेल्या पुरुष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
पाइपलाइनचे काम त्वरित सुरू करा: इंद्रायणी नगर ते वाय जंक्शन पाइपलाइनचे काम तातडीने सुरू करावे, जेणेकरून शहराला नियमित पाणी मिळेल.
जलकुंभ बांधणी: दोन जलकुंभ बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून कामाला गती द्यावी, कारण साठवण टाक्या नसल्याने भामा आसखेडचा पाणीपुरवठा बंद झाल्यास संपूर्ण शहर अडचणीत येते.
एक दिवसाआड पाणी: सर्व कामे पूर्ण होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा आणि त्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करावे.
अनधिकृत कनेक्शन्सवर कारवाई: अनधिकृत नळजोडणी धारकांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करावी आणि कारवाई करावी.
कर्मचार्यांवर कारवाई: शहरात आणि हद्दीबाहेर अनधिकृत कनेक्शन्स देणाऱ्या कर्मचार्यांवर कठोर पावले उचलावीत.
दैनंदिन पाणी किंवा पाणीपट्टी माफ: दररोज पाणी मिळावे, अन्यथा वर्षभराची पाणीपट्टी आकारू नये.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली की, या मागण्या ठरलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. आंदोलनादरम्यान आळंदी पोलीस ठाण्याकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





