Alandi ram navami: आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला ‘शिंदेशाही पगडी’ अवतार; रामनवमीनिमित्त चंदन उटीची पर्वणी

Alandi ram navami: तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर मनमोहक ‘चंदन उटी’ साकारण्यात आली. यंदा माऊलींच्या समाधीवर चंदनाच्या माध्यमातून अत्यंत देखणा असा ‘शिंदेशाही पगडी’ अवतार साकारण्यात आला, हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार अभिजीत धोंडफले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारली. चंदनाच्या उटीतून शिंदेशाही पगडीचा राजबिंडा पेहराव समाधीवर अत्यंत जिवंतपणे कोरण्यात आला.
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये रामनवमीनिमित्त समाधीवर चंदन उटी साकारण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा मिळावा आणि देवाला विविध अवतारांत पाहायला मिळावे, या श्रद्धेतून ही उटी लावली जाते. प्रभू रामाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी ही उटी साकारली जाते, यंदाच्या ‘शिंदेशाही’ पगडीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. आळंदीत सर्वत्र राम मदिंरांसह सर्व ठिकाणी हा धार्मिक महोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


