Alandi Ram Navami 2026: येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान (श्री राम मंदिर) यांच्या वतीने आयोजित सन २०२६ चा श्री रामजन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक आणि हरिनाम गजरात उत्साहात पार पडला. माऊली मंदिर व ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीनंतर सोहळ्याची सांगता पारंपरिक आरती व प्रसाद वितरणाने झाली. सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरबुवा कपलाने महाराज यांनी हृदयस्पर्शी वाणीतून नारदीय कीर्तन सेवा सादर केली. श्रींचा अभिषेक, पूजा, वेदमंत्रांचा जयघोष आणि हरिनाम गजराच्या पारंपरिक वातावरणात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानंतर मंदिरात पुष्पवृष्टी करत श्रींची प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनाची योग्य व्यवस्था करून भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. श्री राम मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, विविधरंगी फुलांची सजावट, तसेच ग्रामप्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. बँड, नगारखाना आणि सवाद्य मिरवणुकीच्या गजरात श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था व अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी येथील वारकरी विद्यार्थी हरिनामाचा गजर करत ‘जय श्रीराम’च्या जयघोषात ग्रामप्रदक्षिणेत सहभागी झाले. सोहळ्यात शांतता कमिटी सदस्य व माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले पाटील, संकेत वाघमारे, माऊली घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर, बाबासाहेब भंडारे, दिनेश मावडीकर, विलास वाघमारे, भाऊ पाटील, मंगेश तिताडे, मोहन महाराज शिंदे, माऊली महाराज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वेदपाठशाळा, आळंदी यांच्या वतीने रुद्राभिषेकाचे मंत्रपठण झाले. भरतनाट्यम सादरीकरण डॉ. परिमल फडके यांच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केले. याशिवाय पं. रमाकांत पराजपे यांचे वाद्यसंगीत, ज्ञानेश्वरीताई रोकडे महाराज, रामकृष्णजी गरड महाराज, मुक्ता कुलकर्णी, सई देशपांडे, नितीन आवेकर, संजय भावे (सेक्सोफोन), अर्पणा केळकर, अमिता घुगरी, तुषार रिठे, हेमंत आठवले, अमित खरे (बासरी), ज्योती गोराणे, श्यामजी गोऱ्हाणे, ह.भ.प. आबा महाराज गोडसे, विद्या इंगळे (वायलिन), रमा चोभे आदींच्या संगीत-भजन सेवांनी सोहळा रंगला. या प्रसंगी सुमारे २५० मान्यवर, पदाधिकारी, सेवक, वारकरी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर, विश्वस्त अविनाश गुळुंजकर, अर्जुन मेदनकर, लक्ष्मीकांत दंडनाईक, चिन्मय चोभे, रमेश मुसुडगे, तसेच माजी विश्वस्त बिपीन चोभे, ओक काका यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. श्री रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात आगमन झाल्यावर पूजन करण्यात आले. माऊली देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते मानकरींचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, योगी निरंजन नाथसाहेब, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, वैजयंता उमरगेकर, सुरेश वडगावकर, नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, तुकाराम महाराज ताजने, बाळासाहेब महाराज शेवाळे आदी उपस्थित होते. आळंदी महाद्वार येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रींची पूजा, पाळणा आणि आरतीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक विविधतेचा संगम साधत आळंदीतील रामजन्मोत्सव सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला.