आळंदी: आगामी आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आज सोमवारी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान आळंदी व दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग सचिन कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संचलन झाले. आळंदी पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन नगरपरिषद चौक- पीसीएमटी चौक-वाय जंक्शन- देहूफाटा- चाकण चौक- केळगाव चौक- घुंडरे आळी चौक- वडगाव चौक- मरकळ चौक- विठ्ठल रुक्मिणी चौक- पोलिस स्टेशन असा मुख्य रूट होता. या रूट मार्चमध्ये १ एसीपी, २ वपोनी, २० सपोनि/पोउपनि, १०५ अंमलदार आणि १ आरसीपी पथक असे एकूण १२९ कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. नरके यांनी दिली. निवडणुकीदरम्यान शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.