Alandi Crime: सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला आळंदी पोलिसांनी 12 तासात केले जेरबंद (Video)

आळंदी – रात्रीच्या वेळी कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीला आळंदी पोलिसांनी (Alandi police) अवघ्या दोन तासात गुन्ह्यात वापरलेल्या गाडीची ओळख पटवून 12 तासाच्या आत जेरबंद केले. या टोळीने गुरुवारी (दि. 22) रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान चऱ्होली खूर्द हद्दीत वडगाव रोडवरील सुरेशनगर येथे दरोडा टाकला होता. यावेळी लोखंडी कोयता, विळ्याचा धाक दाखवून घरातील सोने व रोख रक्कम असा 97 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळून गेले होते. याप्रकरणी रमेश थोरवे यांनी फिर्याद दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दरोडेखोरांचा शोध घेत 12 तासात दरोडेखोरांना जेरबंद केले.
Alandi Crime: सशस्त्र दरोडा घालणाऱ्या टोळीला आळंदी पोलिसांनी 12 तासात केले जेरबंद pic.twitter.com/cJz4fkEd9Q
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 23, 2024
पृथ्वीराज सुखदेव चव्हाण (वय 26, रा. दापोडी, केडगाव. ता. दौड, पुणे), कोहीनूर विशाल पवार (वय 21, रा. चोराची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे), धिरज उत्तम चव्हाण (वय 35, रा. दापोडी, केडगाव, ता. दौड. पुणे) नरेश धनाजी सकीरा उर्फ हाकला (वय 25, रा. चोराची आळंदी ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली स्काॅर्पिओ (वाहन क्र. एम.एच 42, बी.जे. 5596) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लोहार करत आहेत.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास रमेश विठ्ठल थोरवे (वय 43, रा. चऱ्होली खुर्द) आणि त्यांची पत्नी घरी झोपलेले असताना स्काॅर्पिओतून आलेल्या पाच जणांनी थोरवे यांच्या घरावर लाथा मारून घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर जबरदस्तीने घरात प्रवेश करुन रमेश थोरवे, त्यांच्या पत्नी आणि वडील यांच्या गळ्याला आरोपींनी कोयता आणि विळ्याचा लावून धाक दाखवत घरातील सोने आणि रोख रक्कम आरोपींनी दरोडा घालून चोरून नेली. थोरवे यांनी आळंदी पोलिसात घडलेल्या घटनेबाबत फिर्याद दाखल करताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरेल्या गाडीचा शोध लावला. आणि 12 तासाच्या आत जेरबंद केले.
याप्रकरणातील काही आरोपी सराईत आहेत. त्यामध्ये एक मास्टरमाईंड देखील आहे. या आरोपींना आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्याच ठिकाणी दरोडा घालायचा होता. मात्र तेथे लोक जागे होते त्यातच तिथे पोलिस आले. त्यामुळे त्यांनी तेथील दरोड्याचा प्लॅन रद्द करून जाता जाता वडगाव रोडवरील थोरवे यांच्या घरी दरोडा घातला.
ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. 3 डाॅ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे, डीबी पथकातील अंमलदार पो.हवा. लोणकर, पो.ना. बाजीराव सानप, पो.काॅ. रवी खेडकर यांसह सहकाऱ्यांनी केली.





