आळंदी : आळंदी नगरपरिषद हद्दीतील साखरे महाराज पुलाजवळील मुख्य रायझिंग लाईनला गळती लागल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे गुरुवार, 23 एप्रिलपासून अंदाजे दीड दिवस संपूर्ण आळंदी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आळंदी नगरपरिषदेने याबाबत जाहीर आवाहन जारी करून सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा दुरुस्तीनंतर रोटेशन पद्धतीने सुरळीत केला जाईल. तथापि, तांत्रिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम लांबल्यास पाणीपुरवठा सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही सुचवण्यात आले आहे.