Alandi Devachi Siddhabet: संत लीलाभूमीत भाविकांचा ओघ वाढला; आगामी 5 वर्षात सिद्धबेटात होणार विविध विकासकामे

आळंदी (एम.डी.पाखरे / ज्ञानेश्वर फड) – संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदीला वर्षभरात लाखो भाविक भेट देत असतात. माऊलींच्या समाधी दर्शनानंतर दुसरे महत्वाचे ठिकाण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास असलेले ठिकाण सिद्धबेट. याठिकाणी भाविक आवर्जुन भेट देत असतात. गेल्या काही वर्षांत येथे विकासकामे झाली आहेत. त्यामुळे आता सिद्धबेट पाहण्यासाठी आलेले भाविकांची संख्या दिवसेंदविस वाढत आहे. तसेच आळंदी नगरपरिषद आणि आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या संयुक्त माध्यमातून सिद्धबेटात आगामी काळात विविध विकास कामे होणार आहे.
प्रशासन आणि सेवाभावी संस्थांकडून वृक्षारोपण –
सिद्धबेट हे ठिकाण माऊली समाधी मंदीरापासून चालत जाताना 10 मिनीटे अंतरावर आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे सामाजिक संस्था आणि आळंदी नगरपरिषदेकडून वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन केले जात आहे. त्यामुळे येथिल परिसर सुशोभित होण्यास मदत होत आहे. तसेच सिद्धबेट हा मद्यपींचा अड्डाच आहे की काय असे वाटत असे मात्र आता हे चित्र बदलत असून याठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.
भाविकांच्या विसाव्यासाठीच्या शेडची दुरावस्था –
महाराष्ट्र शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत 2015 साली सिद्धबेट परिसराचा विकास करण्यासाठी 8 कोटी निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यातून याठिकाणी भाविकांना निवाऱ्यासाठी शेड, संरक्षक भिंती, सिद्ध परिक्रमा मार्ग व इतर सुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र येथिल शेडचा भाविकांना कोणताही लाभ होताना दिसत नाही. याठिकाणी अस्वच्छता आणि आजुबाजूला मोठ्या प्रमाणात गवत असल्याचे चित्र आहे. तर रात्रीच्यावेळी हा मद्यपींचा अड्डा बनत आहे.
ऐतिहासिक मंदिर जलपर्णीच्या विळख्यात –
सिद्धबेट ठिकाण हे इंद्रायणीच्या काठावर आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांचे कुटुंब राहत असलेले ठिकाण आहे. येथे विठ्ठलाचे ऐतिहासिक मंदिर असून ते पाण्यात आहे. मंदिराच्या बाजूला कमरेपेक्षा जास्त पाणी आहे. आजुबाजूला जलपर्णीचा विळखा आहे. तसेच मंदिराशेजारी मंदिराचा उल्लेख असणारे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे सिद्धबेट पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना हे मंदिर नेमके कोणाचे आहे? याचे महत्व काय? याची कोणतीही माहिती मिळत नाही.
“आळंदी नगरपरिषद आणि आंतरराष्ट्रीय आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून सिद्धबेटात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावरील संपूर्ण माहिती, त्यांचे बालपण, भिंत चालविलेली प्रतिकृतीसह इतर प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. येथील छोटे नैसर्गिक तलाव, झाडे, ऐतिहासिक मंदिर यांचे शुशोभिकरण करण्यात येणार आहे. वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज परिसर तयार करण्यात येणार आहे. अजान वृक्षांचे संवर्धन करून त्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. तसेच इतरही विकासकामे केली जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत ही कामे होणे अपेक्षित आहे. विकासकामे झाल्यानंतर येथे भाविकांची संख्या वाढेल. रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा अड्डा तयार होतो, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीसांची गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” – अंकुश जाधव, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद










