Alandi Crime: आळंदीत दर्शनाला आलेल्या दोन वृद्धांचे अपहरण; अपहरणकर्त्यांची मागणी ऐकून पोलीसही हादरले

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – आळंदी येथे दर्शनासाठी आलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचे अपहरण करून अज्ञात आरोपीने त्यांच्या नातेवाईकांकडे २ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि धमकावले. ही घटना मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी चार वाजता चाकण चौक, आळंदी येथे घडली.
याबाबत सदानंद दगडु गायकवाड (३५, रिसोड, वाशीम) यांनी गुरुवारी (दि. ११) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दगडु शिवराम गायकवाड (६२), प्रशीक आंबोरे (६०) अशी अपहरण झालेल्या वृद्धांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन सुरेश मोरे (३०, चऱ्होली खुर्द, खेड) आणि एक महिला (४०, चऱ्होली खुर्द, खेड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडील दगडु गायकवाड आणि त्यांचे मित्र प्रशीक आंबोरे हे आळंदी येथे ९ डिसेंबर रोजी दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर दोघेही मंदिराजवळ असलेल्या चाकण चौकात आले. तिथे कार मधून आलेल्या आरोपींनी दोघांचे अपहरण केले.
त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडे २ लाख रुपयांची खंडणी देण्यासाठी सक्ती केली आणि धमकावले. सदानंद गायकवाड यांना याबाबत फोन वरून माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व सूत्रे हलवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आळंदी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.





