Alandi : आळंदी नगरपरिषद हद्दीतील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेत निवासी राहणाऱ्या मुलांकडून चिल्ड्रन हेल्प लाईन (१०९८) वर गंभीर तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संस्थेतील २१ मुलांची सुरक्षित सुटका केली असून संबंधित आरोपीविरुद्ध आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोषणाचे प्रकरण उघड – तपासणी दरम्यान संस्थेत अध्यात्मिक शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचे लैंगिक, शारीरिक व मानसिक शोषण झाल्याचे उघड झाले. प्रवेशीत मुलांनी चौकशीत सांगितले की संस्थेतील महाराजांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइनची तत्पर कारवाई – तक्रार मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइन पुणे यांनी त्वरित हालचाल केली. दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता चाइल्ड लाईन प्रकल्प समन्वयक अली अन्सारी आणि पर्यवेक्षक संगीता लोखंडे यांनी संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन मुलांशी संवाद साधला. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या – पाहणीदरम्यान संस्थेत अनेक गंभीर उणिवा आढळून आल्या. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक पालकांचे अर्ज व छाननी समिती नव्हती. नियमाप्रमाणे रखवालदारासह आवश्यक कर्मचारी वर्ग नव्हता. मुलांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी व हवेशीर स्नानगृहे आणि स्वच्छतागृहे नव्हती. भोजनाचा कोणताही निश्चित मेनू नव्हता. मुलांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवण्यासाठी गेट रजिस्टर नव्हते. प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक सेवांचे क्रमांक दर्शविणारे फलक, तक्रार पेटी आणि संस्थेचे नियम व अटी सांगणारे कोणतेही फलक नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवासी विद्यार्थी ठेवण्यासाठी कोणत्याही शासन विभागाचा वैध परवाना संस्थेकडे नव्हता. २१ मुलांचे सुरक्षित पुनर्वसन – बालकल्याण समिती क्र. ०२ पुणे यांच्या आदेशान्वये बालस्नेही टास्क फोर्स आणि आळंदी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या सहकार्याने संस्थेतील सर्व २१ मुलांना महिला व बाल विकास विभागाच्या मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये सुरक्षितपणे हलविण्यात आले. कारवाईच्या वेळी केस वर्कर निवृत्ती शिंगणकर, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) शत्रुघ्न रुस्तुम खोकले आणि आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमा नरके हेही उपस्थित होते.