एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू… भगवान शंकराच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा लूक व्हायरल

Akshay Kumar New Movie: अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच आता अक्षयच्या नवीन चित्रपटातील भूमिकेचे पोस्टर समोर आले आहे. अक्षयने त्याचा नवीन चित्रपट ‘कन्नप्पा’मधील लूक शेअर केला आहे. या चित्रपटासोबतच आता तो टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील पदार्पण करणार आहे.
तेलुगु भाषेतील ‘कन्नप्पा’ या चित्रपटाची गेल्यावर्षी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्याने चित्रपटातील कलाकारांचा लूक समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री काजल अग्रवालचा देवी पार्वती यांच्या भूमिकेतील लूक समोर आला होता. आता अक्षय कुमारचा भगवान शंकराच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. या लूकसोबतच चित्रपटाच्या रिलीजची तारीख देखील समोर आली आहे.
कन्नप्पा चित्रपटामध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसेल. पोस्टरमध्ये अक्षय एका हातात त्रिशूळ आणि एका हातात डमरू घेतलेल्या भगवान शंकरांच्या रौद्र अवतारात दिसत आहे. निळा कंट, गळ्यात रुद्राक्षाची माळ, जटा असा अक्षयचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. याआधी देखील अक्षयने ‘ओ माय गॉड’ या चित्रपटात महादेवाची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
अक्षयने नवीन चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘कन्नापासाठी महादेवाच्या पवित्र भूमिकेत पाऊल ठेवत आहे. हे महाकाव्य मोठ्या पडद्यावर आणणे हा गौरव आहे. या दिव्य प्रवासात भगवान शिव आम्हाला मार्गदर्शन करतील. ओम नमः शिवाय।”
दरम्यान, भगवान शंकरावर आधारित कन्नप्पा चित्रपटात अभिनेता विष्णू मांचू प्रमुख भूमिकेत आहे. तर प्रभास, अक्षय कुमार, मोहनलाल, सरथकुमार, मधु, मोहन बाबू, काजल अग्रवाल आणि ब्रह्मनंदन या कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. मुकेश कुमार सिंग यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.





