Sky Force Movie : अक्षय कुमारने शेअर केला ‘स्काय फोर्स’चा लूक, म्हणाला एअर फोर्सचा गणवेश ‘अभिमानाची गोष्ट’

बॅालवूडचा खिलाडी कुमार त्याच्या आगामी स्काय फोर्स या चित्रपटासाठी उत्सक आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून स्काय फोर्स प्रदर्शित होण्याची आतुरता प्रेक्षकांना लागलेली आहे. अभिनेता अक्षय कुमार ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात त्याची मुख्य भूमिका असून हवाई दलाचा गणवेश परिधान केलेले फोटो त्याने इन्स्टाग्रावरून शेअर केले आहेत. त्याच्या या लूकला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.
‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन सुरू केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, तो आतापर्यंत 150 हून अधिक चित्रपटांचा भाग आहे. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे.अशा कथांमध्ये मोठी ताकद असते. हवाई दलाचा गणवेश परिधान करणे अत्यंत अविश्वसनीय आहे. अभिमानही वाटतो. स्काय फोर्स ही सन्मान, धैर्य आणि देशभक्तीची कहाणी आहे. हे बघायलाच हवे, अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी यांनी केले आहे. स्काय फोर्स ही 1965 च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर भारताने केलेल्या प्रतिहल्ल्याची कथा आहे. स्काय फोर्स 24 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री निम्रत कौर आणि सारा अली खान देखील दिसणार आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाहिला ‘स्काय फोर्स’
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या स्काय फोर्स चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. त्यांच्यासोबत सीडीएस जनरल अनिल चौहान आणि इतर अधिकाऱ्यांनीही हा चित्रपट पाहिला. त्याने त्याच्या अधिकृत X अकाऊंटवर चित्रपटातील स्टार कास्टचे फोटोही शेअर केले आहेत.




