Akluj News : मका हमीभाव केंद्र व कोल्ड स्टोरेजसाठी पाठपुरावा करणार – खा.धैर्यशील मोहिते-पाटील

प्रभात वृत्तसेवा
अकलूज – अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने घोड्यांच्या धावण्याच्या विविध स्पर्धा (इंडोरन्स) आयोजित कराव्यात. यासाठी देशासह परदेशातील लोकही हजेरी लावतील व अकलूजचे पर्यटनही वाढेल. याचबरोबर घोडे निगराणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबिर आयोजित करावे, असे सूचित करून अकलूज येथे मका हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी व कोल्ड स्टोरेजसाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिले.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या १७ व्या घोडेबाजाराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील बोलत होते. कार्यक्रमास आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,आ.उत्तमराव जानकर, सयाजीराजे मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, उद्योगपती सी. पी. बागल, युवानेते रणजित चौरे, जि.प. माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,
उपसभापती मामासाहेब पांढरे, संचालक आनंद फडे, लक्ष्मण पवार, आप्पा रुपनवर, कांताआबा मगर यांच्यासह समितीचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविकातमध्ये बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते -पाटील म्हणाले की, अकलूजच्या घोडेबाजाराचा देशपातळीवर लौकिक आहे. येथे व्यापाऱ्यांना व घोड्यांनासर्व सुविधा आहेत.
पाडव्या अगोदरच दोन महिन्यांपासून व्यापारी येथे येतात. अकलूज बाजार समितीला सुमारे ४ कोटीचे उत्पन्न मिळाले असून एक कोटीपेक्षा अधिकचा नफा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड.धनंजय देशमुख यांनी केले. संचालक नितीन सावंत यांनी आभार मानले.
बाजारात सुमारे ८०० घोडे दाखल..
समितीचे मुख्य सचिव राजेंद्र काकडे म्हणाले की, घोडेबाजारात आतापर्यंत ७२० घोड्यांची आवक होऊन ९८ घोड्यांची विक्री झाली आहे. एक कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे. आणखी बाजारात ७०० ते ८०० घोडे दाखल होणार आहेत.



