Akhil Gogoi : काँग्रेस प्रादेशिक पक्षांनाच शत्रू मानते; अखिल गोगोई यांची टीका
काँग्रेस पक्ष भाजपपेक्षा प्रादेशिक पक्ष आणि जनतेच्या स्वतंत्र आंदोलनांना आपला मुख्य शत्रू मानतो, असा गंभीर आरोप आसाममधील रायजोर दलाचे प्रमुख अखिल गोगोई (Akhil Gogoi) यांनी केला आहे.

Akhil Gogoi : काँग्रेस पक्ष भाजपपेक्षा प्रादेशिक पक्ष आणि जनतेच्या स्वतंत्र आंदोलनांना आपला मुख्य शत्रू मानतो, असा गंभीर आरोप आसाममधील रायजोर दलाचे प्रमुख अखिल गोगोई (Akhil Gogoi) यांनी केला आहे. आसाममध्ये काँग्रेसने युती तोडल्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि राजकीय कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना पत्र लिहून पक्षाच्या भूमिकेवर टीका केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात गोगोई (Akhil Gogoi) यांनी काँग्रेसवर समांतर आंदोलने आयोजित करून रायजोर दलाच्या जनआंदोलनाला कमकुवत केल्याचा आरोप केला. अशा प्रकारामुळे सत्ताधारी सरकारला आंदोलने दडपण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२९ मध्ये भाजपचा पराभव करायचा असेल, तर स्वतंत्र जनआंदोलनांना विरोधी पक्षांनी पाठिंबा देणे आवश्यक असल्याचे गोगोई यांनी नमूद केले. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना अशा आंदोलनांच्या पाठीशी उभे करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
योगेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या वर्चस्ववादी भूमिकेवर टीका केली. विरोधी आघाडीत काँग्रेसने समान भागीदार म्हणून काम करावे, एकमेव नेतृत्वाचा आग्रह धरू नये, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, आसाम काँग्रेसने ३ सप्टेंबर रोजी युतीधर्माचे उल्लंघन केल्याचा आरोप करत रायजोर दलाशी संबंध तोडले होते. एप्रिलमधील विधानसभा निवडणुकीत रायजोर दलाने १३ जागा लढवून दोन जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला १९, तर भाजपप्रणीत एनडीएला १०२ जागा मिळाल्या होत्या. गोगोई (Akhil Gogoi) यांनी पुढील निवडणुकांच्या किमान वर्षभर आधी मित्रपक्षांशी जागावाटप निश्चित करण्याची मागणीही केली आहे.






