Akash Anand : मला माफ करा; पुन्हा पक्षात घ्या; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी

लखनौ : बसपच्या प्रमुख मायावती यांची त्यांचे भाचे आकाश आनंद यांनी रविवारी जाहीर माफी मागितली. मला माफ करा; पुन्हा पक्षात घ्या, अशा आशयाचे साकडे त्यांनी घातले. त्यांनी मायावती यांचा उल्लेख एकमेव राजकीय गुरू आणि रोल मॉडेल म्हणून केला.
आकाश यांच्या काही कृतींमुळे नाराज झालेल्या मायावती यांनी मार्च महिन्याच्या प्रारंभी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आकाश यांच्या जागी त्यांचे वडील आनंद कुमार यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. हकालपट्टी होण्याआधी आकाश यांच्याकडे बसपमध्ये मायावती यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून पाहिले जात होते. मायावती यांनी त्यांना राजकीय वारसदार म्हणूनही जाहीर केले होते.
मात्र, ते सासऱ्यांच्या प्रभावाखाली कार्य करत असल्याचा संशय बळावल्याने मायावती यांनी कारवाईचे पाऊल उचलले. आता ३० वर्षीय आकाश यांनी पक्षकार्यात नातलगांना आणि विशेषत: सासरच्या मंडळींना हस्तक्षेप करू न देण्याची ग्वाही दिली आहे. मायावती भाच्याला माफ करणार का आणि पुन्हा पक्षात घेणार का ते लवकरच स्पष्ट होईल.





