Raigad : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी दोघांसाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. या निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येऊन ठेपली आहे, तसतसे तयारीला वेग घेतला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निवडणुकांना समोरे जाण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महायुतीमधील नेत्यांनी स्पष्ट केले होते. पण रायगड जिल्ह्यातून अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पालकमंत्री पद हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या पदासाठी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा पालकमंत्री पदासाठी होत आहे. मात्र, अद्याप हा प्रश्न निकाली काढता आलेला आहे. यावरून शिंदेसेना विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. हेही वाचा : “ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही तर….” ; नायजेरियाला डोनाल्ड ट्रम्प यांची लष्करी कारवाईची धमकी अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री पदावरून सेना विरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदेंच्या सेनेचे भरत गोगावले यांच्यात आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा रायगडच्या राजकारणात होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्रित येत आघाडी स्थापन केली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शनिवारी एकत्र येऊन एक दिलाने लढविण्याचा आणि निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, अशोक भोपतराव, दीपक श्रीखंडे यांच्यासह उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, भिवसेन बडेकर, प्रदीप ठाकरे यांसह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हेही वाचा : निघोज कुंड पर्यटनस्थळी वाढली गर्दी; विकासकामांमुळे परिसरात नवचैतन्य