पुणे जिल्हा | अजित पवारांचा सरदार, माञ शिंदे सेनेनेच भरला दरबार

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणुकीत त्यांना अपयश आले. निवडणूक संपल्यानंतर मात्र आढळराव पाटील यांचे राजकीय ऋणानुबंध राष्ट्रवादीत जुळले नसल्याचे समोर येत आहे.
कारण त्यांच्या रविवारी (दि. 28) लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे नेहमीप्रमाणे भरलेल्या जनता दरबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिरूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. एकमेव आढळराव पाटील वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणीही पदाधिकारी कार्यकर्ता दिवसभरात येथे उपस्थित नव्हता. यामुळे अजित पवारांचा सरदार, शिंदे सेनेने भरला दरबार, अशी चर्चा मात्र यावेळी रंगली.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास महा मंडळाच्या अध्यक्ष पदी (म्हाडा ) शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शासनाकडुन नुकतीच नियुक्ती झाली. त्यांनी मागील आठवड्यात पदभार स्वीकारला. त्यानंतर पहिलाच रविवार म्हणून आढळराव पाटील यांचे अभिनंदन करायला त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मान्यवरांची गर्दी लोटली होती. हारतुरे, बुके आणि फोटो सेशनने वातावरण आनंदी आणि उत्साही बनले होते.
कार्यकर्त्यांची खंत
लोकसभेच्या पराभवानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना एखादे महत्त्वाचे पद मिळाले. त्याबद्दल सध्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कोणीही नसावे याची खंत गर्दितले कार्यकर्ते एकमेकांना बोलुन दाखवीत होते. याची बेरीज वजाबाकी येणार्या विधानसभा निवडणुकीत होण्याचे संकेत त्याद्वारे मिळत होते.
नक्की कोणत्या पक्षात?
लांडेवाडी येथे झालेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दरबारात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांशी आत्मीयतेने होणारा संवाद, सहवास असे चित्र पाहून आढळराव पाटील आता नेमके कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित पत्रकार करीत होते.
त्याला मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. लोकांना अडचणी येतात, समस्या निर्माण होतात. ही कामे व्हावीत यासाठी दरबाराचे नियोजन करण्यात येते, असे उत्तर आढळराव पाटील देत होते.
खेडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार, माजी खासदार विधानसभेला एकत्र येणार का?-
लोकसभेला खेड तालुक्यातील मतदारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला मोठी आघाडी दिली. निकालाची आकडेवारी पहाता आढळराव पाटील आणि मोहिते पाटील यांच्या जोडीला पसंती मिळाली नसल्याचे समोर आले. शिवाजीराव आढळराव पाटील तीनदा खासदार राहिले.
तर दिलीप मोहिते पाटील यांची चौथी पंचवार्षिक सुरू आहे. या दोन नेत्यांमध्ये कधीच पटले नव्हते. लोकसभेला आढळराव पाटील राष्ट्रवादीत आले. म्हणुन त्यांच्या बरोबर मोहिते पाटील प्रचारात दिसले. ही शोलेची दोस्ती प्रत्यक्षात मतदानात उतरली नाही. निकाला नंतरही या नेत्यांचा किंवा त्यांच्या समर्थकांचा संवाद, सहवास दिसुन आला नाही.
मोहिते-आढळरावांचे सख्य पुन्हा उघड
लोकसभा निवडणुकी आधी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील वितुष्टता बाहेर आली होती. त्यानंतर दिलजमाई फक्त दिसण्यापुर्ती झाल्याचे निवडणुकीनंतर दिसून आले. तरमे अखेरीस आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा तर 22 जुलैला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस खेड तालुक्यात दिमाखात साजरा झाला. त्यात फ्लेक्स किंवा कार्यक्रमात आढळराव पाटील यांना कुठेही स्थान मिळाले नाही. याउलट आढळराव पाटील यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
त्याचे अभिनंदनाचे फ्लेक्स फक्त शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झळकावले. त्यात मोहिते पाटील किंवा अजित पवार यांना जागा मिळाली नसल्याचे स्पष्ट दिसुन आले. या पार्श्वभूमीवर येणार्या विधानसभा निवडणुकीत खेड आळंदीत या दोन नेत्यांमध्ये काय राजकरण पाहायला मिळणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही शिरूर लोकसभा मतदारसंघात साडेपाच लाख मते आढळराव पाटील यांना मिळाली आहेत. याचे भान सहकारी पक्षांच्या नेते मंडळींनी असू द्यावे. – भगवान पोखरकर, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष, पुणे





