Ajit Pawar : ‘काम शंभर टक्के करतो, अन्यथा करत नाही’; अजित पवारांचं शरद पवारांसमोर जोरदार भाषण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत जोरदार भाषण करत आपली कार्यशैली स्पष्ट केली. “आपण कुठलेही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा करत नाही,” असे सांगत त्यांनी सहकार क्षेत्रातील निर्णयक्षमतेवर भर दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत बोलताना अजितदादांनी साखर कारखान्यांच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. या व्यासपीठावर दोन्ही पवार एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शरद पवार -अजित पवार एकाच व्यासपीठावर
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्वाची बैठक शरद पवार आणि अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यातील १६३ साखर कारखान्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाची ही बैठक होती. पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे उपस्थित होते. चर्चेत गुणवत्ता वाढ, AI चा वापर आणि शेतकऱ्यांना भत्ता देण्यावर भर देण्यात आला.
अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील, राजेश टोपे तुम्हीही शंभर टक्के लागवड करा. आपण केलं तरच लोकांना सांगू शकतो.” याशिवाय, संस्थेने ५००० शेतकऱ्यांना १८ हजार रुपये प्रति हेक्टर भत्ता देण्याचा निर्णय घेतला असून, हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर आहे. पुढील वर्षी वेगळी योजना असेल, असेही त्यांनी सांगितले.
‘राजकीय द्वेष नको, चांगले कारखाने निवडा’
अजित पवारांनी सांगितले की, राज्यातील आठ साखर कारखान्यांना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी मदत करण्याचे सांगितले आहे. “केवळ त्या कारखान्यांचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे अशी अट आहे. यात कुठलेही राजकीय द्वेष न आणता चांगल्या कारखान्यांची निवड केली जाईल.” शाह कारखान्यांतील इतर प्रकल्पांना कमी व्याजाने पैसे देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘विचारधारा सोडली तर नोटीस”; संग्राम जगतापांना इशारा
संग्राम जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, “मी कालच सांगितले होते की नोटीस काढली जाईल. तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य असाल तर विचारधारा सोडून बोलला तर नोटीस देणार.” हे वक्तव्य पक्षातील शिस्तीचा पुरस्कार करणारे आहे.





