“अजित पवारांची टीका दु:खद, आबा हयात असते तर उत्तर दिले असते” – रोहित पाटील

Maharashtra Assembly Election 2024 – सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर आर. आर. आबांनी सही केली असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट अजित पवार यांनी तासगाव येथील सभेत केला. अजित पवारांच्या या विधानावर आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांनी आबांवर केलेली टीका आमच्यासाठी दु:ख आहे. आबांना जाऊन 9 ते साडे 9 वर्षे झालेले आहेत. ते आज हयात असते तर त्यांनी अजित पवारांना चांगल्या भाषेत उत्तर दिले असते, असे रोहित पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आबा गेले तेव्हा मी साधारण 15 वर्षांचा होतो. आज मी अजित पवारांच्या टीकेला उत्तर देणार नाही, कारण अजित पवार वरिष्ठ नेते आहेत. आम्ही 9 वर्षे त्यांच्या नेतृत्वात ताकदीने काम केले आहे.
असे असताना त्यांनी अशापद्धतीने टीका करणे आमच्यासाठी दु:खद आहे. एखादा घोटाळा आपण केला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. कर नाही तर डर कशाला. पण आज आबा असते तर त्यांनी उत्तर दिले असते, असे रोहित पाटील म्हणाले.
आरोपांचे केले खंडन
अजित पवार यांनी आबांवर केलेल्या टीकेतून सिद्ध काय होणार होते, याची मला कल्पना नाही. त्यावेळी काय घडामोडी घडल्या असतील त्याची उत्तरे आबा हयात नसताना देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणाने, स्वच्छपणाने काम करत होते. गृहमंत्री असताना त्यांनी पारदर्शकपणे पोलिस भरती करुन घेतली.
राज्यातील डान्सबार बंदी घातली होती. आबा गेल्यानंतर साडे नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर दु:ख होत आहे. आज त्यांच्या वक्तव्याने कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना दु:ख झाले आहे. अजित पवारांनी आबांवर केलेल्या आरोपाचे आम्ही खंडन करतो, असेही रोहित पाटील म्हणाले.





