पिंपरी, (प्रतिनिधी) – अजित पवारांनी घड्याळ हिसकावून घेतले, पण शरद पवारांनी चपळाईने त्यातील सेल काढून घेतले आहेत. त्यामुळे अजितदादांचे घड्याळ चालतच नाही अशी मिश्किल टिपणी अॅड. असीम सरोदे यांनी यावेळी केली. सत्तांतराच्या प्रक्रियेत शिवसेनेने निर्णय घेण्यास दिरंगाई केली त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला. शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे याविषयी सर्वोच्च न्यायालयाला कधीतरी निर्णय घ्यावाच लागेल. पक्ष कोणाचा याचा निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाला हक्क नाही. याकडे सरोदे यांनी लक्ष वेधले. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ज्अयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर आदी उपस्थित होते. अॅड. सरोदे म्हणाले की, नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात कोणीच अपात्र नाही. त्यांनी निव्वळ वेळ काढूपणा केला, हा अनुभव पाहता यापुढे पक्षांतर होऊच नये यासाठी कठोर कायदे झाले पाहिजेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचा खरा जबाब पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळं आम्ही स्वतंत्र जबाब नोंदवून घेत, सगळी हकीकत न्यायालयात सादर करणार होतो. मात्र त्या आधीच आरोपीचा एन्काऊंटर झाला, तो शंकास्पद आहे. फक्त या पीडित मुलींना न्याय देण्याचा विषय नाही, तर प्रत्येक मुलीला सुरक्षित शिक्षण मिळावें, यासाठी एक कायदा बनवण्याचा मानस आहे. गोरख भालेकर, सचिन साठे, महेंद्र चिंचवडे, अॅड. अविनाश ववले, संतोष चांदेरे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक नाना शिवले यांनी तर आभार नंदकुमार कांबळे यांनी मानले.