अजित पवार होणार वारीत सहभागी विधानसभेतून केली घोषणा

मुंबई : आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीच्यादिशेने निघाले आहेत. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता विठ्ठल नामाचा जप करत हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी चालताना दिसत आहेत. यंदा प्रथमच वारीत सहभागी होणाऱ्य दिंडींना राज्य सरकारकडून प्रती दिंडी 20 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तर, राजकीय नेत्यांचा वारीतील सहभागामुळे यंदाची वारी चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार स्वत: पायी वारीत सहभागी होणार आहेत, तर राहुल गांधींनाही वारीतील सहभागाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायी वारीत सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
”वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे, वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली आहे. मी अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथील पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात वारी उत्सवात सहभाग घेतला. मात्र, मला काही अद्याप जाता आलं नाही, पण उद्या पालखी बारामतीत मुक्कामाला येत आहे. परवा मी, सकाळपासून काटेवाडीपर्यंत वारीत चालत जाणार असल्याची” घोषणा अजित पवारांनी आज विधानसभेत केली.
शरद पवारांना लगावला टोला
आता, सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावसं वाटतंय, मग आपणही सहभागी होऊया, असे म्हणत नाव न घेता गालावर स्मितहास्य करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावल्याचं दिसून आलं.





