Ajit Pawar : “महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो…”; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Ajit Pawar | Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘शरद पवार’ हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
अश्यातच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या सोबत पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांना घराबाहेर पत्रकारांनी गराडा घातला.
यावेळी त्यांना भेट घेण्यामागचे कारण काय? भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अजित पवारांनी भाष्य केले. ‘आम्ही इन जनरल विषयांवर चर्चा केली. चहा, पाणी, नाश्ता केला आणि निघालो’, असे अजित पवार म्हणाले. आम्ही शरद पवारांसोबत अनेक विविध विषयांवर चर्चा केली. इथे काय सुरु आहे, तिथे काय सुरु आहे, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
परभणीला काय घडलं यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडींवरही आम्ही बोललो. इन जनरल चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, अधिवेशन केव्हा आहे, यावरही चर्चा केली. चहा पाणी नाश्ता झाला, आता निघालो, असे अजित पवारांनी म्हटले.
तसेच आमच्या तिघांचा शपथविधी झाला. बाकीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार, १६ तारखेला हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे तेव्हा कामकाज करण्यासाठी मंत्रिमंडळाची आवश्यकता असते. यावरही चर्चा झाली. येत्या १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे अजित पवार म्हणाले.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सुद्धा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.” या आशयाचे ट्विट अजित पवारांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट :
अजित पवार यांनी पक्षात बंड करून 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह शिंदे-फडणवीसह सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. यावेळी स्वत: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर इतर आठ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.





