प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव शहराच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज (दि. २०) तळेगाव दाभाडे येथील नविन प्रशासकीय इमारतीसमोर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.ही योजना महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत राबविण्यात येत असून, वडगाव शहराला शाश्वत व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले आहे.यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, क्रिडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके असतील. विशेष उपस्थिती म्हणून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (भा.प्र.से.) हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम असून, माजी राज्यमंत्री संजय भेगडे व उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांचीही उपस्थिती लाभणार आहे.