प्रभात वृत्तसेवा पिंपरी – अठराशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याविरोधात आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आपने थेट सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल करत, या सरकारला भूखंड माफिया, जमीन दलाल, भू-स्मगलर आणि जमीन लुटारूंचे सरकार असे संबोधले आहे. हा घोटाळा सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशांची आणि शहराच्या विकासाची लूट असल्याचा आरोप आपने केला आहे. याविरोधात आपने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रविवारी (दि. ९) आंदोलन केले.या घोटाळ्याला कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. पार्थ पवार यांच्यावर त्वरित ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. जनतेच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी हा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार आपने केला आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी शांत बसणार नाही, अशी घोषणा आंदोलनात करण्यात आली आहे.