Ajit Pawar : पुणे ग्रँड चॅलेंज टूर! अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सूचना ; म्हणाले, “राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका”

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग सुमारे ४३७ किलोमीटर असून, जिल्ह्यातील २०० गावांतून ही स्पर्धा जाणार आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक करा. राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.स्पर्धेसाठी चांगले रस्ते बनविण्यासाठी पुणे महापालिका १२५ कोटी रुपये, पिंपरी चिंचवड महापालिका ७० कोटी रुपये, पीएमआरडीए १७० कोटी रुपये, तर सार्वजनिक बांधकाम विभाग ७१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
हे रस्ते १५ डिसेंबरपूर्वी रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, आता केवळ दीड महिने कालावधी उरला आहे. या कामांची निविदा काढल्यानंतर काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जिल्हा प्रशासन याला बधले नाही. याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी लोगो अनावरण कार्यक्रमात ठेकेदारांचे कान टोचून कामाच्या दर्जाविषयी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.





