“वंदनीय, आदरणीय साहेब, मला खोलात जायला लावू नका”; मराठा आरक्षणावरून अजितदादांचा शरद पवारांना खोचक टोला

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वाद आता उघडपणे समोर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारने घटनेत बदल करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी सूचना केली.
यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया देत, “जे ही सूचना करतायत, ते अनेक वर्षे सत्तेत होते, दहा वर्षे केंद्रात होते. ते पुजनीय, वंदनीय आहेत. पण मला खोलात जायला लावू नका,” असा जोरदार टोला लगावला आहे. या विधानाने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. “तामिळनाडूत 72 टक्के आरक्षण शक्य आहे, मग महाराष्ट्रात का नाही? घटनेत बदल करून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल. प्रगतीसाठी आरक्षण हा मार्ग आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे, तर स्वतंत्रपणे आरक्षण मिळावे, यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका ” असे शरद पवार यांनी मांडली.
अजित पवारांचा खोचक प्रत्युत्तर
शरद पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “जे सध्या सूचना करतायत, त्यांनी अनेक वर्षे सत्ता भोगली आहे. दहा वर्षे केंद्रात मंत्रिपद उपभोगले. ते आदरणीय, वंदनीय, पुजनीय आहेत, पण मला जास्त खोलात जायला लावू नका.” अजित पवारांनी शरद पवारांचे नाव घेणे टाळले असले तरी, त्यांचा इशारा स्पष्ट होता. मराठा आरक्षणावर केंद्राला सूचना करण्यापेक्षा सत्तेत असताना ठोस पावले का उचलली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाचा तिढा कायम
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात प्रचंड तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला बसून सरकारला शनिवार-रविवारील डेडलाइन दिली आहे. हैदराबाद आणि सातारा संस्थानच्या गॅझेटीअरच्या आधारावर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मাগणी त्यांनी लावून धरली आहे.
याचवेळी शिंदे समितीने हैदराबाद गॅझेटीअरला तत्वत: मंजुरी दिल्याचे जाहीर केले असून, पुढील निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीकडे आहे. मात्र, शरद पवारांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत घटनादुरुस्तीची मागणी करत नवे वादाला तोंड फोडले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडण्यास सांगितले आहे.





