Suresh Dhas : मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही; सुरेश धस यांचा युटर्न

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात राजकारण पेटले आहे. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते.त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांकडून धनंजय मुडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मागणीत भाजप आमदार सुरेश धस देखील आघाडीवर होते.
पण आता त्यांनी एका मुलाखतीत मी राजीनाम्याची मागणी केलीच नसल्याचे विधान करत युटर्न घेतला आहे. त्यांच्या युटर्नवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं धसांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं, नंतर त्यांनी राजीनामा मागितला नाही, अशी दुटप्पी भूमिका धस यांची असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
तसेच संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांचा खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. धस मुख्यमंत्री यांनाही भेटले अजितदादाना भेटले, हा त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीत असताना महायुतीचे भान ठेवावे. ते आमच्यावरही टीका करतात, पण कोणाकडे बोट दाखवताना त्यांनी भान ठेवावे. कोणाकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात असा टोला अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांना लगावला.





