Jayant Patil-Ajit Pawar : नवा ट्विस्ट…! अजित पवार-जयंत पाटील एकाच व्यासपीठावर, रोहित पवारही उपस्थित,

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पक्ष फुटीनंतर जयंत पाटील यांनी शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. लोकसभा निवडणुकीत या गटाला चांगले यश मिळाले, परंतु विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
या पार्श्वभूमीवर, वाळवा तालुक्यात प्रथमच अजित पवार आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर येणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला रोहित पवारही उपस्थित राहणार असल्याने या घटनेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा समारंभ शनिवारी होणार आहे. अजित पवार यांच्या आत्या सरोज पाटील यांच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. सरोज पाटील या संस्थेच्या सचिव आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसला, तरी कुटुंबातील समारंभ असल्याने अजित पवार, जयंत पाटील आणि रोहित पवार एकत्र येणार आहेत. पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणे ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
जयंत पाटलांचा वाळव्यातील प्रभाव
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर आपला मतदारसंघ असलेल्या वाळवा तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आव्हान देणाऱ्यांना घेरण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत अजित पवारांसोबत एकाच व्यासपीठावर येणे आणि त्यांचे भाषण याकडे सर्वांचे लक्ष असेल.
अजित पवार-जयंत पाटलांचा भूतकाळातील वाद
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांवर विकासकामे, उसाचा दर आणि इतर मुद्द्यांवरून जोरदार टीका केली होती. जयंत पाटलांनीही त्याला प्रत्युत्तर देत अजित पवारांवर पलटवार केला होता. या वादग्रस्त पार्श्वभूमीवर आता दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने त्यांचे समर्थक आणि राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात काय घडणार, याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.





