Ajit Pawar : बारामतीत स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार यांच्या भव्य स्मारकास एकमताने मंजुरी
बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वर्गीय लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली.

Ajit Pawar : बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वर्गीय लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
सभागृहात सर्व सदस्यांनी दादांच्या बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील अतुलनीय योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रस्तावाची माहिती देताना स्मारकाच्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. दादांच्या (Ajit Pawar) दूरदृष्टीची आठवण सांगताना त्यांनी भावूक होत सांगितले की, याच ठिकाणी उंच मनोरा उभारून विकसित झालेली बारामती नागरिकांना पाहता यावी, असा दादांचा मानस होता.
मात्र, नियतीच्या क्रूर खेळामुळे आज त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. दादांचे स्वप्न, त्यांची विकासदृष्टी आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहावे, यासाठी हे स्मारक उभारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभागृहातील चर्चेदरम्यान नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी दादांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, दर्जेदार आणि भव्य स्मारक उभारण्यात यावे, असे मत व्यक्त केले.
नगरसेवक जय पाटील यांनी दादांप्रती असलेले जनतेचे प्रेम अधोरेखित करत, असे भव्य स्मारक बारामतीत उभारले जाणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
नगरसेवक अमर धुमाळ यांनी दादांची (Ajit Pawar) कीर्ती, विकासदृष्टी आणि कार्याचा गौरव करत स्मारक प्रेरणादायी स्वरूपाचे असावे, असे सांगितले. नगरसेवक सोमनाथ गजकस यांनी हे स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर नगरसेवक गणेश जोजारे यांनी दादांच्या कार्याच्या उंचीला साजेसे स्मारक उभारण्यात यावे, असे मत मांडले. राजेंद्र सोनवणे, अभिजीत जाधव, अभिजीत चव्हाण, निलेश इंगोले, स्मारक बाबत आपले विचार व्यक्त केले. भव्य व देखण स्मारक उभारावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, नगरसेवक अमोल कावळे यांनी या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देत, स्वर्गीय अजितदादा पवार यांचे संपूर्ण आयुष्य सामान्य माणसासाठी समर्पित होते. त्यामुळे त्यांचे स्मारकही सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुले आणि निःशुल्क असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दादांनी आयुष्यभर जनतेसाठी आपले दरवाजे खुले ठेवले होते, त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी येणाऱ्या दादाप्रेमी आणि नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारू नये, हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचा आणि विविध क्षेत्रातील कार्याचा माहितीपट व चलचित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे आढावा सादर करण्यात यावा, अशी सूचनाही सदस्यांनी केली. त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण वस्तू, वापरातील साहित्य, छायाचित्रे, दस्तऐवज, सन्मानचिन्हे आणि ऐतिहासिक आठवणींचा संग्रह करून तेथे संग्रहालय उभारण्यात यावे, जेणेकरून पुढील पिढ्यांना दादांच्या कार्याची ओळख होऊन त्यातून प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमुखाने ठरावास मंजुरी देत, हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ न राहता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा, विकासदृष्टीचा आणि जनसेवेच्या वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
बारामतीच्या प्रगतीचा शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या दादांच्या कार्याची चिरंतन स्मृती जपणारे हे स्मारक भविष्यात बारामतीच्या वैभवात भर घालणारे आणि लाखो नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणारे नवे केंद्र ठरणार असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.






