मोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासाठी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. चाकण हिंसाचार प्रकरणी सरकार मोहिते यांना विनाकारण टार्गेट करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
मराठा मोर्चावेळी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोप ठेऊन माजी आमदार दिलीप मोहितेच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.
अजित पवार म्हणाले, ‘चाकण दंगल प्रकणी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. वातावरण चिघळयाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग्य दिशेने तपास व्हायला हवा. कुणालाही टार्गेट करू नका,’
दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे. आज न्यायाधीशांनी दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेत हा निर्णय दिला आहे. चाकण हिंसाचार प्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एम अंबळकर यांच्यापुढे आज सुनावणी झाली. यापूर्वी दि.१२ जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी आजची (दि.१८)तारीख दिली होती.





