Ajit Pawar : निवडणुका स्वबळावर की युती? अजित पवारांनी सस्पेन्स कायम ठेवला ; म्हणाले..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असतो. कार्यकर्ते सज्ज असले पाहिजेत. एकदा निवडणुका जाहीर होऊन, उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुका स्वबळावर की युतीद्वारे लढविणार ही बाब गुलदस्त्यात ठेवली.अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तुटपुंजी असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षात काम करताना असे आरोप करावे लागतात.
जेवढी मदत दिली जाते, त्यापेक्षा जास्त मिळावी, असा विरोधकांचा आग्रह असतो. त्यांनी सत्तेत असताना किती मदत दिली होती, याचे आत्मचिंतन करावे.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे अद्याप प्रस्ताव पाठवला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हवामान विभागाने विशेषतः कोकण भागात अजूनही पावसाचा इशारा दिला आहे. पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ज्या ठिकाणी ओलावा आहे किंवा जमीन खरवडून गेली आहे, तिथे पंचनामे करण्यास वेळ लागत आहे. मात्र, ते तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा एकत्रित प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल, असेही ते म्हणाले.
संग्राम जगताप यांना नोटीस..
आमदार संग्राम जगताप यांच्या दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा या विधानावर अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, संग्राम जगताप यांचे वक्तव्य मला अजिबात मान्य नाही. त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन कोणताही खासदार, आमदार किंवा जबाबदार पदाधिकारी अशी वक्तव्ये करत असेल, तर ती पक्षाला कदापि मान्य नाहीत.
रवींद्र धंगेकर यांच्याविषयी ते म्हणाले, धंगेकर यांच्या बहुधा लक्षात येत नाही की ते आता काँग्रेसमध्ये नाहीत. ते आता धनुष्यबाण चिन्हासह शिवसेनेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना भाजप आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे पक्षात काम करताना काही गोष्टी पाळणे आवश्यक असते.





