Ajit Pawar: फॉर्म भरायला उशीर झाला घाबरू नका! ‘लाडक्या बहिणी’साठी अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले….

Ajit Pawar | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावे. राज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होत आहे. फॉर्म भरण्यासाठी रांगा लागल्याचं दिसत आहे. फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरू नका. एकाद्या भगिनीने ऑगस्टमध्ये जरी ‘लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरला तरी जुलै महिन्याने दीड हजार रुपये या महिलांना ऑगस्टमध्ये दिले जातील, असं देखील अजित पवार म्हणाले.
बारामती पंचायत समिती येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, राज्याच्या विकासाकरीता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
त्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’योजना, महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावे, ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये. अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये १९ ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आजअखेर १ लाख ३४ हजार ४९८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात ७ हजार ६४८ इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शुन्य रक्कमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे. सर्व घटकातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रशासनासोबत सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे. महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढे यावे, असे आवाहन पवार यांनी केले.
ही योजना नेमकी काय आहे?
या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. २१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.
कधीपासून लागू होणार ही योजना?
महाराष्ट्र सरकारने मुली आणि महिलांसाठी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जातील. ही योजना येत्या जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.
२ लाख मुलींना लाभ मिळणार
राज्यातील ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ज्या मुली उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील, त्यांचे फी माफ करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले. या योजनेंतर्गत दरवर्षी २ लाख मुलींना लाभ देण्याची योजना आहे. यासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.





