पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (१५ जानेवारी) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आझम पानसरे यांच्या घरी थेट भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कालच आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक प्रभागांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी आझम पानसरे यांच्या घरी बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांची भेट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रयत्नांचा भाग असू शकते की, निहालच्या प्रवेशानंतर आझम पानसरे यांना स्वतःच्या गटात आणण्यासाठी आमंत्रण देण्याचा प्रयत्न आहे, याबाबत उत्सुकता आहे. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. जागावाटपावर फक्त दोन जागांवरून तिढा असून, लवकरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. भाजपला रोखण्यासाठी पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही दोन्ही राष्ट्रवादींची जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत आहेत. ही युती महापालिका निवडणुकीत मोठा बदल घडवू शकते. ही घडामोडी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची ठरत आहेत.